मॅजिनो लाइन
मॅजिनो लाइन तथा लिन मॅजिनो ही १९३० च्या दशकात फ्रांसने जर्मनीची आगळीक रोखण्यासाठी केलेली तटबंदी होती. त्याकाळच्या फ्रांसच्या युद्धमंत्री आंद्रे मॅजिनोचे नाव दिलेली ही तटबंदी फ्रांसने स्वित्झर्लंड, जर्मनी आणि लक्झेंबर्गच्या सीमांलगत उभारली होती. बेल्जियम हे पहिल्या महायुद्धात तटस्थ राष्ट्र असल्याने ही तटबंदी बेल्जियमच्या सीमेवर उभारलेली नव्हती. ही तटबंदी म्हणजे भिंत नसून पक्के बंकर, सैन्य आणि रणगाड्यांना अवरोधण्यासाठीचे अडथळे आणि शस्त्रास्त्रसाठ्यांच्या आणि ठाण्यांचा समावेश होता.
बलाढ्य अशा या तटबंदीला विमाने, सशस्त्र सैन्य तसेच रणगाड्यांविरुद्ध सहजपणे तग धरण्यास शक्य होते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मनीने या तटबंदीला बगल देऊन थेट नेदरलँड्स व बेल्जियमवर हल्ला केला व तेथून फ्रांसवर चढाई केली. असे होणार याचा अंदाज असल्याने फ्रेंच व ब्रिटिश सैन्याने बेल्जियमच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात जमाव केला होता. आर्देनच्या घनदाट जंगलातून वाट काढणे जर्मन सैन्याला अशक्यप्राय वाटून दोस्त राष्ट्रांनी तेथे अधिक कुमक ठेवली नव्हती. जर्मनीने याचा फायदा घेत तेथून मुसंडी मारली व फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याची फळी दुभंगली. ब्रिटिश सैन्याने बेल्जियममधून पळ काढत डंकर्कमधून माघार घेतली. दक्षिणेस जर्मनांच्या कचाट्यात सापडलेले फ्रेंच सैन्य अधिक काळ तग धरू शकले नाही व त्यांनी हार पत्करली.
अतोनात खर्च करून बांधलेल्या या तटबंदीचा शेवटी फ्रांसला फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खर्च करून उभारलेल्या व उगीचच सुरक्षिततेची खोटी हमी देणाऱ्या गोष्टींना मॅजिनो लाइन असे हिणकस नाव दिले जाते.